Monday, May 4, 2015

घरोघरी करोकरी गीता जाऊ दे.








घरोघरी करोकरी गीता जाऊ दे 
अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे ।।ध्रु।।

कर्म न टळते कधी कुणाला 
या कर्माचा का कंटाळा?
उद्योगे मनुजाला विकार जिंकू दे ।।१।।

मरणाचे भय का वाटावे? 
तनी मनाने का गुंतावे? 
'अनादि मी - अनंत मी' ऐसे वाटू दे ।।२।।

सत्य मधुर वच वदता यावे 
तटस्थतेने बघता यावे 
ध्येयाचा ध्यास जिवा सदैव लागू दे ।।३।।

जे जे पटले आचरीन मी 
जे जे कळले ते शिकविन मी 
कृष्णाशी समरसता अशीच साधू दे ।।४।।

गीता कळते गाता गाता 
गीता कळते जीवन जगता 
संस्कारे मज माझा स्वभाव बदलू दे ।।५।। 

जे ज्याचे त्या करता अर्पण 
अर्जुन बनतो स्वतःच मोहन 
या देही या जन्मी स्वराज्य लाभू दे ।।६।।