माझ्या वडीलांनी म्हणजे श्री श्रीराम आठवले यांनी लिहिलेले "गीता कळते गाता गाता" हे काव्य या ब्लॉग वर आधीच अपलोड केलेले आहे॰ गीता कळते गाता गाता हे १९८२ चे श्रीकृष्ण प्रकाशन॰ त्याची दुसरी आवृत्ति १९८५ मध्ये निघाली॰ यामागची प्रेरणा कै अण्णा देवधर यांची॰ श्री मोहिनिराज ओंकार यांनी हे संगीतबद्ध केले आणि ही गीतमाला "ओंकार संगीत साधना" तर्फे सादर केली जायची. याचे ध्वनिमुद्रण मी रोज एक गाणे याप्रमाणे गीता कळते गाता गाता या ब्लॉगवर अपलोड करत आहे. निवेदन अर्थातच श्री श्रीराम आठवले यांचे.
पहिल्यांदा अर्थात भूपाळी.
एके दिवशी नित्याप्रमाणे गीता वाचता वाचता गीतेची भूपाळीच स्फुरली. मन उल्हासित झालं. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात ती नित्य गावी. गीतार्थ उमलून या.
प्रभात झाली येवो उदया गीतार्थाचा रवी
हृदयी सद्गुरु शिकवो मजला व्यास कवींचा कवी!ध्रु.
नको फलाशा कर्म घडावे घे रसने नाम
स्मरण हरीचे करी साधका सहजच निष्काम
कृष्णच कर्ता कृष्ण करविता तो वदवी लिहवी!१
तनु ही येई तशीच जाई हे ध्यानी घेई
आत्मरूप तव सतेज अक्षय तू तुजला पाही
तोल मनाचा सांभाळावा योगेश्वर स्फुरवी!२
नको वैर वा लोभ धनाचा विरक्ती ऐश्वर्य
निसर्गच तो खरा महात्मा ज्या हृदयी धैर्य
अनुभव यावा अंगुलि धरुनी श्रीहरी मज चालवी!३
सुखदु:खी सम होता यावे हरिशी सहयोग
भोग भोगुनी सार साधका तो जीवनयोग
कंटकातले सुमन हासरे सहवासा बोलवी!४
वक्ता माधव श्रोता पांडव श्रवणी समरसता
जे श्रवले ते कृतीत येण्या आतुर उत्सुकता
श्रीरामाला माधव सद्गुरु भक्तिमार्ग दावी!५
No comments:
Post a Comment