Saturday, July 8, 2017

गीतारहस्य नित्यपाठ

गीतारहस्य नित्यपाठ

कृष्ण कृष्ण म्हणत मला कृष्ण व्हायचे
त्यज विकार कर विचार हे म्हणायचे ! १
कृष्णजन्म बंदिगृही मुक्त तो सदा
गीता ही कथित सार चिंतका तदा ! २
मन अपुले अलग करुनि शांत व्हायचे
नयन मिटुन मार्ग सुचुन मुक्त व्हायचे ! ३
मीच मला सावरता विजय लाभला
मन ओतुनि सजवी कर्म भक्त तो भला ! ४
यश येवो अपयशही फरक कोणता?
आस फली नसत तिथे खेद कोणता? ५
दु:खमूळ वखवख ती फेकता दुरी
संयमात सौख्य सहज समजवी हरी ! ६
कृष्ण कसा जगला गीतेत हे कळे 
लोकमान्य चरित गूढ चिंतने कळे ! ७
समजे जे थोडेही वाचणे पुन्हा
आचरणी आणुनि ते सांगणे जना ! ८
सोसुनि आघात सहज दडव वेदना
सोने निकषा उतरत सरत मीपणा ! ९
यत्ना ना जमत असे या जगी नसे
वैराग्ये मनुजाची कांति खुलतसे ! १०
मन प्रसन्न जग प्रसन्न मर्म जाणणे
हसर्‍याचे वावरणे दिसत देखणे ! ११
दु:खाला विसरताच दु:ख संपते
आठवता भूत बनुनि छळत सतत ते ! १२
जगलो वा मेलो वा सृष्टि चालते
सुजन कधि मीपणास माथि मिरवते ! १३
सृष्टीशी समरसता सत्व वाढते
रुसता तुज लागे जगण्यास एकटे ! १४
गीतेचे हे रहस्य जाण नाम घे
बदल किती तनि मनि तव तू बघून घे ! १५
आसक्ती दु:खमूळ हट्टही नको
काम नको क्रोध नको द्वेषही नको ! १६
जे लाभे त्यात तोष हाव ना कधी
तो प्रसन्न कार्य करी जग म्हणे सुधी ! १७
कौशल्या लाव पणा कार्य करत जा
हरिपूजा तीच समज दंभ कर वजा ! १८
यश लाभे कधि अपयश हर्ष खेद ना
मन ज्याचे नित्य तृप्त तो रुचे जना ! १९
निर्मल मन, निर्मल तन मतिहि निर्मला
आत्मतृप्त हरिभक्ता जगति ना तुला ! २०
अभय मनी शक्ति तनी देत प्रार्थना
गीतामृत नित सेवी त्यास भ्रांति ना ! २१
आत्म्याचा कर विचार जाण तू स्वत:
तूच कृष्ण कृष्णहि तू उमज तत्वत: ! २२
कर्म करी सर्व हरि फलहि हरीला
हे कळले तोच जगी पूर्ण मोकळा ! २३
आत्मा हा जीव प्राण त्या विना कुडी
कोसळते भूमीवर दीन बापडी ! २४
जोवरती जीव आत शर्थ तू करी
तोवरती कार्य करुन म्हण हरी हरी ! २५
देव असे जरि न दिसे सुज्ञ जाणतो
नीति जगे त्या श्रीहरि ध्यानि भेटतो ! २६
जैसा मी तैसे जन जाणता खुला
प्रगतीचा मार्ग असा चालणे तुला ! २७
तूच राम तूच कृष्ण स्वस्वरूप ते
ओळख ही पटली तुज भाग्य समज ते ! २८
संतोषा नाव मोक्ष खूण स्वस्थता
बुद्धि शुद्ध तन हि स्वच्छ सहज अवस्था ! २९
मजवरती तेच प्रेम हरिवर जडता
व्यक्ति होय हरिमय ती हीच धन्यता ! ३०
हृदयी वसत घडवि कार्य सद्गुरु म्हणा
कर्म सुबक सुखद शुभद हटवि मीपणा ! ३१
बुद्धि शांत सम ठेवू घेऊ दक्षता
आत्मरूप देव बघत भाव तो स्वत: ! ३२
गीतेचे हे रहस्य टिळक सांगती
श्रीरामा कळत तसे शब्द बोलती ! ३३

Thursday, July 6, 2017

श्रीगीतास्तोत्र



श्रीगीतास्तोत्र

गीतेचे ध्यान मी नित्य करावे चित्त लावुनी
अंतरी कृष्ण पाहावा ऐकावे हात जोडुनी।१
सद्गुरु कृष्ण वाटू दे जिज्ञासू पार्थ मी स्वतः 
रंगावे सुख संवादी बाणावे ऐक्य तत्वतः।२
मोहना मोह ना राहो कोण मी मजला कळो
देहबुद्धि त्वरे जावो सोsहं तो मी कळो,वळो।३
ओघाने कर्म आलेले आज्ञा ती तव वाटु दे
मी न कर्ता, तूच कर्ता भाव हा हृदी वाढु दे।४
सत्यार्थ झुंज झुंजावी वृत्ति निर्भय दे मला
ढळो ना चित्तशांती ही योगेशा प्रार्थितो तुला।५
ज्ञानाग्नि पेटता राहो पापे त्या पुढती किती
कर्म साधन सुंदरसे ज्ञानलाभार्थ संप्रती।६
विश्वरूपा अणुरूपा अनंता अच्युता तुला
वंदना नम्र मी केली तुझ्या तू सावरी मुला।७
आत्मविश्वास वाढावा समता लेश ना ढळो
अष्टश्लोकात जे आले श्रीरामाला कळो वळो।८

।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, July 4, 2017

निवृत्तीने ज्ञान होतसे, सोपान लाभे मुक्तीचा....

निवृत्तीने ज्ञान होतसे, सोपान लाभे मुक्तीचा
विठ्ठल रुक्मिणी मायतात वारसा देत हरिभक्तीचा ! ध्रु.

भलेबुरे श्रीहरी जाणता कर्तव्याला करायचे
कृष्णच कर्ता कृष्ण करविता अभ्यासाने ठसायचे
गीता जगता होते सोपी सांगावा श्रीपार्थाचा ! १

महिषमुखाने वेदमंत्र ये बोलविता धनि विठ्ठल हो
संकेताने भिंत चालली चालविणारी रुक्मिणी हो
कृतज्ञतेने तनी नम्रता अमोल ठेवा जपायचा ! २

हरिपाठाची संगत लागे रंगत जाते जीवन हो
हरि हरि म्हणता सूर्य प्रकाशे तिमिर लयाला जाते हो
अमृतानुभव भाविक घेई साधक ऐसा भाग्याचा ! ३

कंटकमय पथ तरी चालणे ध्यास धरावा ध्येयाचा
सहन करावे हसत जगावे धर्म शुद्ध आचाराचा
माणुसकीने वाग माणसा सुबोध ऐसा संतांचा ! ४

परमार्थाचा पंचप्राण हा इथे तिथे श्रीभगवंत
दात आपुले ओठ आपुले अपमानाची का खंत?
अंत:स्थाला स्मरता होतो नारायण नर नित्याचा ! ५

रचयिता : श्रीराम बाकृष्ण आठवले

Sunday, July 2, 2017

क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी

क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी  

अगाध करणी तुझी गमतसे मला अच्युता
झणी पळतसे दुरी मम मनातली खिन्नता
मना निवविते तुझी अतुलनीय संजीवनी   
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी १
तुझीच वसती असे कळतसे हृदी केशवा  
म्हणूनि नित भेटतो उघडुनी मना माधवा
तुझाच शिशु चालवी धरुनि बोट रस्त्यातुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी २
असंख्य घडल्या चुका गणति मी कशाला करू?
तरीहि पद सोडिना क्षणभरी तुझे लेकरू
सुधारिन चुका असे म्हणुनि ठेवि आश्वासनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ३
अपार करुणा तुझी गमत देवकीनंदना
धरूनि रशना करी पुढति ने रथा मोहना
तुझ्यासम गुरु कधी मिळत काय लाखातुनी?
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ४
सुदर्शन तुझे पळात पळवी अकर्मण्यता
रवीस बघता कुठे तिमिर राहते तत्वत:
स्वकर्म रुचु दे नकोच दुसरे तुझ्यापासुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ५
नसेन जर पार्थ मी घडव ना मला तू तसे
तुझ्याच करि मृत्तिका करि मला हवे तू तसे
कुणी न जगती मला यदुविरा तुझ्यावाचुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ६
तसाचि जर राहिलो कमिपणा तुला लागला
म्हणूनि करि रे त्वरा मम गळा बहू दाटला
विकार विरवी, मला बनवि संयमी नी मुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ७
समाज सगळा तुझे घटित रूप रे आगळे 
कुणी न मुळि वेगळा मम ममत्व आटोपले   
इदं न मम मंत्र स्फुरव रोमारोमातुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले