क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी
अगाध करणी तुझी गमतसे मला अच्युता
झणी पळतसे दुरी मम मनातली खिन्नता
मना निवविते तुझी अतुलनीय संजीवनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी १
तुझीच वसती असे कळतसे हृदी केशवा
म्हणूनि नित भेटतो उघडुनी मना माधवा
तुझाच शिशु चालवी धरुनि बोट रस्त्यातुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी २
असंख्य घडल्या चुका गणति मी कशाला करू?
तरीहि पद सोडिना क्षणभरी तुझे लेकरू
सुधारिन चुका असे म्हणुनि ठेवि आश्वासनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ३
अपार करुणा तुझी गमत देवकीनंदना
धरूनि रशना करी पुढति ने रथा मोहना
तुझ्यासम गुरु कधी मिळत काय लाखातुनी?
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ४
सुदर्शन तुझे पळात पळवी अकर्मण्यता
रवीस बघता कुठे तिमिर राहते तत्वत:
स्वकर्म रुचु दे नकोच दुसरे तुझ्यापासुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ५
नसेन जर पार्थ मी घडव ना मला तू तसे
तुझ्याच करि मृत्तिका करि मला हवे तू तसे
कुणी न जगती मला यदुविरा तुझ्यावाचुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ६
तसाचि जर राहिलो कमिपणा तुला लागला
म्हणूनि करि रे त्वरा मम गळा बहू दाटला
विकार विरवी, मला बनवि संयमी नी मुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ७
समाज सगळा तुझे घटित रूप रे आगळे
कुणी न मुळि वेगळा मम ममत्व आटोपले
‘इदं न मम’ मंत्र स्फुरव रोमारोमातुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment