Tuesday, July 4, 2017

निवृत्तीने ज्ञान होतसे, सोपान लाभे मुक्तीचा....

निवृत्तीने ज्ञान होतसे, सोपान लाभे मुक्तीचा
विठ्ठल रुक्मिणी मायतात वारसा देत हरिभक्तीचा ! ध्रु.

भलेबुरे श्रीहरी जाणता कर्तव्याला करायचे
कृष्णच कर्ता कृष्ण करविता अभ्यासाने ठसायचे
गीता जगता होते सोपी सांगावा श्रीपार्थाचा ! १

महिषमुखाने वेदमंत्र ये बोलविता धनि विठ्ठल हो
संकेताने भिंत चालली चालविणारी रुक्मिणी हो
कृतज्ञतेने तनी नम्रता अमोल ठेवा जपायचा ! २

हरिपाठाची संगत लागे रंगत जाते जीवन हो
हरि हरि म्हणता सूर्य प्रकाशे तिमिर लयाला जाते हो
अमृतानुभव भाविक घेई साधक ऐसा भाग्याचा ! ३

कंटकमय पथ तरी चालणे ध्यास धरावा ध्येयाचा
सहन करावे हसत जगावे धर्म शुद्ध आचाराचा
माणुसकीने वाग माणसा सुबोध ऐसा संतांचा ! ४

परमार्थाचा पंचप्राण हा इथे तिथे श्रीभगवंत
दात आपुले ओठ आपुले अपमानाची का खंत?
अंत:स्थाला स्मरता होतो नारायण नर नित्याचा ! ५

रचयिता : श्रीराम बाकृष्ण आठवले

No comments: