Saturday, July 8, 2017

गीतारहस्य नित्यपाठ

गीतारहस्य नित्यपाठ

कृष्ण कृष्ण म्हणत मला कृष्ण व्हायचे
त्यज विकार कर विचार हे म्हणायचे ! १
कृष्णजन्म बंदिगृही मुक्त तो सदा
गीता ही कथित सार चिंतका तदा ! २
मन अपुले अलग करुनि शांत व्हायचे
नयन मिटुन मार्ग सुचुन मुक्त व्हायचे ! ३
मीच मला सावरता विजय लाभला
मन ओतुनि सजवी कर्म भक्त तो भला ! ४
यश येवो अपयशही फरक कोणता?
आस फली नसत तिथे खेद कोणता? ५
दु:खमूळ वखवख ती फेकता दुरी
संयमात सौख्य सहज समजवी हरी ! ६
कृष्ण कसा जगला गीतेत हे कळे 
लोकमान्य चरित गूढ चिंतने कळे ! ७
समजे जे थोडेही वाचणे पुन्हा
आचरणी आणुनि ते सांगणे जना ! ८
सोसुनि आघात सहज दडव वेदना
सोने निकषा उतरत सरत मीपणा ! ९
यत्ना ना जमत असे या जगी नसे
वैराग्ये मनुजाची कांति खुलतसे ! १०
मन प्रसन्न जग प्रसन्न मर्म जाणणे
हसर्‍याचे वावरणे दिसत देखणे ! ११
दु:खाला विसरताच दु:ख संपते
आठवता भूत बनुनि छळत सतत ते ! १२
जगलो वा मेलो वा सृष्टि चालते
सुजन कधि मीपणास माथि मिरवते ! १३
सृष्टीशी समरसता सत्व वाढते
रुसता तुज लागे जगण्यास एकटे ! १४
गीतेचे हे रहस्य जाण नाम घे
बदल किती तनि मनि तव तू बघून घे ! १५
आसक्ती दु:खमूळ हट्टही नको
काम नको क्रोध नको द्वेषही नको ! १६
जे लाभे त्यात तोष हाव ना कधी
तो प्रसन्न कार्य करी जग म्हणे सुधी ! १७
कौशल्या लाव पणा कार्य करत जा
हरिपूजा तीच समज दंभ कर वजा ! १८
यश लाभे कधि अपयश हर्ष खेद ना
मन ज्याचे नित्य तृप्त तो रुचे जना ! १९
निर्मल मन, निर्मल तन मतिहि निर्मला
आत्मतृप्त हरिभक्ता जगति ना तुला ! २०
अभय मनी शक्ति तनी देत प्रार्थना
गीतामृत नित सेवी त्यास भ्रांति ना ! २१
आत्म्याचा कर विचार जाण तू स्वत:
तूच कृष्ण कृष्णहि तू उमज तत्वत: ! २२
कर्म करी सर्व हरि फलहि हरीला
हे कळले तोच जगी पूर्ण मोकळा ! २३
आत्मा हा जीव प्राण त्या विना कुडी
कोसळते भूमीवर दीन बापडी ! २४
जोवरती जीव आत शर्थ तू करी
तोवरती कार्य करुन म्हण हरी हरी ! २५
देव असे जरि न दिसे सुज्ञ जाणतो
नीति जगे त्या श्रीहरि ध्यानि भेटतो ! २६
जैसा मी तैसे जन जाणता खुला
प्रगतीचा मार्ग असा चालणे तुला ! २७
तूच राम तूच कृष्ण स्वस्वरूप ते
ओळख ही पटली तुज भाग्य समज ते ! २८
संतोषा नाव मोक्ष खूण स्वस्थता
बुद्धि शुद्ध तन हि स्वच्छ सहज अवस्था ! २९
मजवरती तेच प्रेम हरिवर जडता
व्यक्ति होय हरिमय ती हीच धन्यता ! ३०
हृदयी वसत घडवि कार्य सद्गुरु म्हणा
कर्म सुबक सुखद शुभद हटवि मीपणा ! ३१
बुद्धि शांत सम ठेवू घेऊ दक्षता
आत्मरूप देव बघत भाव तो स्वत: ! ३२
गीतेचे हे रहस्य टिळक सांगती
श्रीरामा कळत तसे शब्द बोलती ! ३३

Thursday, July 6, 2017

श्रीगीतास्तोत्र



श्रीगीतास्तोत्र

गीतेचे ध्यान मी नित्य करावे चित्त लावुनी
अंतरी कृष्ण पाहावा ऐकावे हात जोडुनी।१
सद्गुरु कृष्ण वाटू दे जिज्ञासू पार्थ मी स्वतः 
रंगावे सुख संवादी बाणावे ऐक्य तत्वतः।२
मोहना मोह ना राहो कोण मी मजला कळो
देहबुद्धि त्वरे जावो सोsहं तो मी कळो,वळो।३
ओघाने कर्म आलेले आज्ञा ती तव वाटु दे
मी न कर्ता, तूच कर्ता भाव हा हृदी वाढु दे।४
सत्यार्थ झुंज झुंजावी वृत्ति निर्भय दे मला
ढळो ना चित्तशांती ही योगेशा प्रार्थितो तुला।५
ज्ञानाग्नि पेटता राहो पापे त्या पुढती किती
कर्म साधन सुंदरसे ज्ञानलाभार्थ संप्रती।६
विश्वरूपा अणुरूपा अनंता अच्युता तुला
वंदना नम्र मी केली तुझ्या तू सावरी मुला।७
आत्मविश्वास वाढावा समता लेश ना ढळो
अष्टश्लोकात जे आले श्रीरामाला कळो वळो।८

।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, July 4, 2017

निवृत्तीने ज्ञान होतसे, सोपान लाभे मुक्तीचा....

निवृत्तीने ज्ञान होतसे, सोपान लाभे मुक्तीचा
विठ्ठल रुक्मिणी मायतात वारसा देत हरिभक्तीचा ! ध्रु.

भलेबुरे श्रीहरी जाणता कर्तव्याला करायचे
कृष्णच कर्ता कृष्ण करविता अभ्यासाने ठसायचे
गीता जगता होते सोपी सांगावा श्रीपार्थाचा ! १

महिषमुखाने वेदमंत्र ये बोलविता धनि विठ्ठल हो
संकेताने भिंत चालली चालविणारी रुक्मिणी हो
कृतज्ञतेने तनी नम्रता अमोल ठेवा जपायचा ! २

हरिपाठाची संगत लागे रंगत जाते जीवन हो
हरि हरि म्हणता सूर्य प्रकाशे तिमिर लयाला जाते हो
अमृतानुभव भाविक घेई साधक ऐसा भाग्याचा ! ३

कंटकमय पथ तरी चालणे ध्यास धरावा ध्येयाचा
सहन करावे हसत जगावे धर्म शुद्ध आचाराचा
माणुसकीने वाग माणसा सुबोध ऐसा संतांचा ! ४

परमार्थाचा पंचप्राण हा इथे तिथे श्रीभगवंत
दात आपुले ओठ आपुले अपमानाची का खंत?
अंत:स्थाला स्मरता होतो नारायण नर नित्याचा ! ५

रचयिता : श्रीराम बाकृष्ण आठवले

Sunday, July 2, 2017

क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी

क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी  

अगाध करणी तुझी गमतसे मला अच्युता
झणी पळतसे दुरी मम मनातली खिन्नता
मना निवविते तुझी अतुलनीय संजीवनी   
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी १
तुझीच वसती असे कळतसे हृदी केशवा  
म्हणूनि नित भेटतो उघडुनी मना माधवा
तुझाच शिशु चालवी धरुनि बोट रस्त्यातुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी २
असंख्य घडल्या चुका गणति मी कशाला करू?
तरीहि पद सोडिना क्षणभरी तुझे लेकरू
सुधारिन चुका असे म्हणुनि ठेवि आश्वासनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ३
अपार करुणा तुझी गमत देवकीनंदना
धरूनि रशना करी पुढति ने रथा मोहना
तुझ्यासम गुरु कधी मिळत काय लाखातुनी?
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ४
सुदर्शन तुझे पळात पळवी अकर्मण्यता
रवीस बघता कुठे तिमिर राहते तत्वत:
स्वकर्म रुचु दे नकोच दुसरे तुझ्यापासुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ५
नसेन जर पार्थ मी घडव ना मला तू तसे
तुझ्याच करि मृत्तिका करि मला हवे तू तसे
कुणी न जगती मला यदुविरा तुझ्यावाचुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ६
तसाचि जर राहिलो कमिपणा तुला लागला
म्हणूनि करि रे त्वरा मम गळा बहू दाटला
विकार विरवी, मला बनवि संयमी नी मुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ७
समाज सगळा तुझे घटित रूप रे आगळे 
कुणी न मुळि वेगळा मम ममत्व आटोपले   
इदं न मम मंत्र स्फुरव रोमारोमातुनी
क्षणोक्षणि मला कळो नविन काहि गीतेतुनी ८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, June 29, 2017

सार गर्भ श्रीगीता (श्रीगीता पोथी); अध्याय अठरावा – मोक्षसंन्यास योग

सार गर्भ श्रीगीता (श्रीगीता पोथी) 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

अध्याय अठरावा – मोक्षसंन्यास योग

श्रीगणेशाय नमः

कृपावंता गजानना। तू पाठीशी असताना।
हुरूप ये गीता कळण्या। अनुभव हा ॥ १ ॥
आरंभी जो खचलेला। तो उत्साहे भरलेला।
कृष्णाचा अर्जुन चेला। शोभतसे ॥ २ ॥
कर्म करावे आलेले। ईश्वरपूजन ते झाले।
नकळत मन निर्मळ बनले। गुरुकृपा ॥ ३ ॥
सद्गुरु हृदयी वसतात। कर्मे करवुनि घेतात।
मन:शांति ये हातात। गुरुकृपा ॥ ४ ॥
कर्मफलाचा लोभ नसो। अपयश येता क्षोभ नसो।
आत सर्वदा हरी दिसो। ही आशा ॥ ५ ॥
जे येते ते सांगावे। गावोगावी हिंडावे।
सन्मार्गा जन लावावे। ही सेवा ॥ ६ ॥
कर्मावरती अधिकार। फलावरी तो नसणार।
तरीहि कर्मे करणार। योगी तो ॥ ७ ॥
मना खुबीने जिंकावे। साक्षित्वाने वागावे।
अलिप्ततेने वर्तावे। व्यवहारी ॥ ८ ॥
सद्विचार सोबती खरा। साथ सर्वदा देणारा।
कर्मि कुशलता देणारा। सन्मित्र ॥ ९ ॥
समाज माझा श्रीराम। समाज माझा श्रीकृष्ण।
जनात पाहिन जनार्दन। तत्वच हे ॥ १० ॥
स्वभाव माझा सुधरेन। प्रामाणिक मी राहीन।
कष्ट करिन तर जेवेन। निश्चय हा ॥ ११ ॥
शरण जायचे कृष्णाला। पातकातुनी तरायला।
निवांत, निश्चल होण्याला। उपाय हा ॥ १२ ॥
यश आले, हुरळणे नको। पराजयाचा खेद नको।
कर्तृत्वाचा गर्व नको। योगेशा ॥ १३ ॥
धर्माचा मज अर्थ कळो। पुन्हा न मन हे कधी मळो। 
जे कळले ते सहज वळो। योगेशा ॥ १४ ॥
यत्न व्यर्थ ना ठरतात। सुधारणा तर हातात।
कळेल गीता जगण्यात। योगेशा । १५ ॥
गीता सगळ्यांची आई। पडत्याला उचलुन घेई।
योगसार हाती देई। ही माता ॥ १६ ॥
प्रतिदिनि गीता वाचावी। बाणवेल ती गुण दैवी।
उठता बसता चिंतावी। श्रीगीता ॥ १७ ॥
गीता ही सर्वांकरिता। औषध ही रोगांकरिता।
देत आसरा निराश्रिता। श्रीगीता ॥ १८ ॥
विकारास मी जिंकेन। तरच धनंजय म्हणवेन।
ध्यानी भजनी रंगेन। गोपाळा ॥ १९ ॥
घरोघरी गीता जावी। सकलांनी ही वाचावी।
गीता आचरणी यावी।  ही आशा ॥ २० ॥
सिद्ध जाहली ही पोथी। गीतेची ही फलश्रुती।
श्रीरामाला हर्ष किती। गुरुकृपा ॥ २१ ॥
  
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीगीता पोथी अर्थात् सार गर्भ श्रीगीता समाप्त

Wednesday, June 28, 2017

सार गर्भ श्रीगीता (श्रीगीता पोथी); अध्याय सतरावा – श्रद्धात्रयविभाग योग

सार गर्भ श्रीगीता (श्रीगीता पोथी) 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

अध्याय सतरावा – श्रद्धात्रयविभाग योग

श्रीगणेशाय नमः

वंदना घ्या गजानना। श्रद्धारहस्य उकलाना।
विलया न्या हो अहंपणा। विनती ही ॥ १ ॥
श्रद्धेविण कृति होत नसे। सात्विक श्रद्धा उचित असे।
राजस तामस बरी नसे। घे ध्यानी ॥ २ ॥
श्रद्धेवर वर्तन ठरते। श्रद्धा आचरणी येते।
सुधारणे या श्रद्धेते। कर्तव्य ॥ ३ ॥
नको फलाशा कधी मनी। विधियुत कर्म करी ज्ञानी।
सात्विक कर्मे आचरुनी। वर्तावे ॥ ४ ॥
सवय असावी दानाची। सवय असावी सेवेची।
सवय असावी कष्टाची। तनामना ॥ ५ ॥
आहाराची सुधारणा। आचाराची सुधारणा।
स्वभावातही सुधारणा। शक्य असे ॥ ६ ॥
आदर ठेवा वृद्धांचा। माय तात आचार्यांचा।
नम्रभाव हा नित्याचा। पथ्यकर ॥ ७ ॥     
मने मनाला शिकवावे। आत्मसंयमन हवे हवे।
सद्गुण अंगी मुरवावे। ही गीता ॥ ८ ॥
सहानुभूती दुःख हरी। सहानुभूती सुख देई।
शीतलता अंतरि येई। राहावया ॥ ९ ॥
सात्विकतेने कर्म करी। ईश्वरास तू सदा स्मरी।
सात्विक भावा मनि ठेवी। ही गीता ॥ १० ॥
ॐ तत् सत् हा मंत्र जप। जाणुन अर्था करी तप।
कधी न लागे तुज पाप। हो सुखिया ॥ ११ ॥
दिले दान ते देवाला। सेवा पोचे श्रीहरिला।
स्वाध्याये नर सुधारला। हे सत्य ॥ १२ ॥
खचायचे ना कधी मनी। सात्विक श्रद्धा बाळगुनी।
करावयाची ही करणी। ईश्वर तू ॥ १३ ॥
हृदयी धरावे दीनाला। पथ दावा चुकलेल्याला।
सदन समजुनी विश्वाला। विचरावे ॥ १४ ॥
कर्ता मी नच, नको फल। तो मी जाणिव आत्मबल।
ॐ तत् सत् चे मधुर फल। हे ऐसे ॥ १५ ॥
श्रद्धेचे बळ जाणावे। आपण अपणा निरखावे।
विकारवश ना कधि व्हावे। मार्ग असा ॥ १६ ॥
कर्तव्याची ही बुद्धी। समजावी ऋद्धी-सिद्धी।
अंत:करणाची शुद्धी। प्रसाद हा ॥ १७ ॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
    

Tuesday, June 27, 2017

सार गर्भ श्रीगीता (श्रीगीता पोथी); अध्याय सोळावा – दैवासुरसंपद् विभाग योग

सार गर्भ श्रीगीता (श्रीगीता पोथी) 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

अध्याय सोळावा – दैवासुरसंपद् विभाग योग

श्रीगणेशाय नमः

गुणेशा हे गणाधिशा। वंदन घे हे परमेशा।
तुझिया भाविका वत्सा। सांभाळावे ॥ १ ॥
अर्जुन कृष्णाला रुचला। अर्जुनास हरि आवडला।
दैवी गुण लाविती लळा। कारण हे ॥ २ ॥
सत्य, अहिंसा, निर्भयता। यज्ञ, दान, तप नियमितता।
रुची चिंतनी, नि:स्पृहता। गुण दैवी ॥ ३ ॥
तेज, अध्ययनि निरलसता। आत्मसंयमन, सुस्थिरता।
मनःशुद्धि, वचनी मृदुता। गुण दैवी ॥ ४ ॥
ऐसे गुणधन बहुमोल। जीवन बनते अनमोल।
ढळू न देते ते तोल। मुक्ति मिळे ॥ ५ ॥
तामस वृत्तीचा दैत्य। त्याच्या चित्ती ना सत्य।
आत्मघातकी, निर्बुद्ध। त्यासम तो ॥ ६ ॥
वर्तन तर त्याचे स्वैर। साधूंशी धरतो वैर।
क्रोर्ये करतो संहार। नराधम ॥ ७ ॥
सदा गुंतला मोहात। रौरव मार्गाला जात।
धर्म आचरे दंभार्थ। असुरच तो ॥ ८ ॥
द्रव्यलालसा छळताहे। मायामोहे भ्रमताहे।
भोगविलासी रुतताहे। उद्धट तो ॥ ९ ॥
नाशा जवळी आणतसे।  ज्ञानाचा लवलेश नसे।
समाजकंटक बनलासे।  नराधम ॥ १० ॥     
मनुजदेह जरि वरी वरी। जात ठरतसे वृत्तिवरी।
आत्मसंयमन देव करी।  दैत्य दुजा ॥ ११ ॥
जीवनात जर सुख यावे। मी देवाचा म्हणवावे।
दैवी गुण संपादावे।  हा मार्ग ॥ १२ ॥
शुद्ध मनाचा ध्यास धरा। रात्रंदिन अभ्यास करा।
शरीर झिजवा उपकारा। सुजाण हो ॥ १३ ॥
कष्टाची भाकरी बरी। कामक्रोध हे क्रूर अरी।
जर बळी पडलो, अविचारी। हो घात ॥ १४ ॥ 
सदाचार, नीती, धर्म। ईश्वरभक्तीचे मर्म।
सावधतेने करु कर्म। या जगती ॥ १५ ॥
स्वर्ग नरक दोन्ही जगती। अंतरातही ते असती।
विकासता दैवी वृत्ती। शांति मिळे ॥ १६ ॥
सुविचारी मन हा योग। कुविचारी मन हा रोग।
जिवाशिवांचा सहयोग। भक्तिबले ॥ १७ ॥
भलेबुरे हे जर कळते। दूर पिटाळा लोभाते।
भगवद्गीता हे कथिते। ईश्वर व्हा ॥ १८ ॥    

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥