सार-गर्भ श्रीगीता (श्रीगीता पोथी)
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
अध्याय दहावा – विभूति योग
श्रीगणेशाय नमः
गजानना एकदंता। वक्रतुण्डा, चतुर्हस्ता।
आदि न अंत न तुज तत्वत:। नमो नम: ॥ १ ॥
अर्जुनाच्या वरी भक्ती। जाणुनी तो शुद्ध मती।
कृष्णा वाटे बोलू किती। ओघ चाले ॥ २ ॥
ओघ चाले भाषणाचा। प्रवाहो हा जान्हवीचा।
सुधा लाजे अशी वाचा। योगेशाची ॥ ३ ॥
जन्म ना ज्या मृत्यु कैचा। सारथी ना अर्जुनाचा।
सर्वेश्वर हा विश्वाचा। ज्ञान होई ॥ ४ ॥
गंगा निघे उद्धराया। सिद्ध स्वामी ज्ञान द्याया।
दिव्य श्रद्धा असे पाया। मंदिराचा ॥ ५ ॥
भक्त भगवंताचे नाते। शब्द कोते वर्णायाते।
जाणती ते परस्पराते। ऐक्यभावे ॥ ६ ॥
देव पाहू कसा कोठे? पूजू त्याला असे वाटे।
औत्सुक्य हे मनी दाटे। नीर लोटे ॥ ७ ॥
भगवंत हा स्वसंवेद्य। सर्वेश्वर हा असे आद्य।
वेदांचे हे प्रतिपाद्य। अनिर्वाच्य ॥ ८ ॥
कृपा करी जगन्नाथा। दिव्य रूपे वर्णी स्वत:।
अच्युता हे दयावंता। उद्धरी बा ॥ ९ ॥
उपासना करायाची। करावी ती उदात्ताची।
उत्कृष्टाची, विभूतीची। अत्यादरे ॥ १० ॥
विभूती या असंख्यात। कोण करी मोजदाद?
पार्था पाहा उत्तमात। मलाच तू ॥ ११ ॥
नगात मी हिमालय। पांडवात मी कौंतेय।
पशूंमधे मीच गाय। आहे, आहे ॥ १२ ॥
भक्तांमध्ये नारद मी। तपस्व्यात प्रल्हाद मी।
सेनानीत स्कंद तो मी। आहे, आहे ॥ १३ ॥
सत्कार्याचा पुरस्कार। दुर्गुणाचा तिरस्कार।
सद्धर्माचा तो प्रचार। माझी पूजा ॥ १४ ॥
कार्यक्षेत्र स्वीकारावे। एकरूप त्याशी व्हावे।
दुर्गुणांना नुरू द्यावे। माझी सेवा ॥ १५ ॥
आदि मीच, मध्य मीच। अंत मीच, सर्व मीच।
मीहि तूच, तूही मीच। भक्तिसार ॥ १६ ॥
भक्तीने हो साध्य योग। विकाराने जडे रोग।
सामरस्य हा संयोग। माझ्याशीच ॥ १७ ॥
दिव्यत्वाची जेथे वस्ती। भव्यत्वाची जेथे वस्ती।
औदार्याची जेथे वस्ती। तेथे मीच ॥ १८ ॥
करी गीतापारायण। नरे व्हावे नारायण।
हेच श्रेष्ठ उपायन। मला द्यावे ॥ १९ ॥
ऐसा दहावा अध्याय। नित्य ध्यात गात जाय।
प्रेम देत घेत जाय। संदेश हा ॥ २० ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment