सार-गर्भ श्रीगीता (श्रीगीता पोथी)
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
अध्याय आठवा – अक्षरब्रह्म योग
श्रीगणेशाय नमः
गजानना नमस्कार। करी मना तदाकार।
संतसंगे सदाचार। सवयीचा ॥ १ ॥
चिंतन ते सदा चाले। जाते वेळी आठवले।
उपभोगी जे जे रमले। गुंतत ते ॥ २ ॥
पाचा भूतांचा देह। नाशवंत नि:संदेह।
ज्या आत्म्याचे तन गेह। तया स्मर ॥ ३ ॥
जेथुनि आलो, चल तेथे। घडीभर वस्ती येथे।
पाहुणाच मी जर कळते। गुंतत ना ॥ ४ ॥
उत्कट ध्यान आत्म्याचे। चिंतन स्वस्वरुपाचे।
स्मरण सर्वदा नित्याचे। सुकृत हे ॥ ५ ॥
देह न मी, हे हो ज्ञान। सोऽहं सोऽहं स्फ़ुरे गान।
रात्रंदिन हे भजन। सर्वांगाने ॥ ६ ॥
सातत्ये सारे जमते। मरणाचे भय ना वाटे।
’सुंदर होईन’ मन गाते। अतिथिचे ॥ ७ ॥
ऋण ज्याचे त्या अर्पावे। निष्कर्जी आपण व्हावे।
देहदु:ख ते सोसावे शांतपणे ॥ ८ ॥
अव्यक्तातून मी आलो। या देही क्षण ठेलो।
निजधामाला चाललो। निरोप द्या ॥ ९ ॥
ॐकाराचा हा घोष। तनामनाला संतोष।
समरसतेचा परिपोष। स्मरणात ॥ १० ॥
ध्यान ज्याचे जन्मभर। परमात्मा अगोचर।
आता सखा परात्पर। अनुभूती ॥ ११ ॥
आशा नाही बाळगली। स्थिती विदेही बाणली।
जन्ममृत्युवार्ता सरली। मुक्तीच ही ॥ १२ ॥
मोक्षपदाला जाणावे। मोक्षपदा आठवावे।
मोक्षपदाला पोचावे। साधकाने ॥ १३ ॥
आता भ्यावे कुणी कोणा? संपलाच दुजेपणा।
सिद्ध सदा भजनाला। हरिदास ॥ १४ ॥
जिवाशिवाची ही भेट। होते धरताच नेट।
पोचवते गती थेट। सुटका ही ॥ १५ ॥
इथून ना परतणे। परंधाम ते गाठणे।
मने जाणे भाविकाने। ध्यास हाच ॥ १६ ॥
नित्य आठवा आठवा। जावे मोक्षाचिया गावा।
भावभुकेला जिंकावा। आत्मबले ॥ १७ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment