सार-गर्भ श्रीगीता (श्रीगीता पोथी)
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
अध्याय अकरावा – विश्वरूपदर्शन योग
श्रीगणेशाय नमः
गणेशा हे विनविले। दे गा कल्पनेचे डोळे।
विश्वरूपे वेडे केले। शहाण्यासी ॥ १ ॥
आदि तूच, मध्य तूच। मध्य तूच, अंत तूच।
अंत तूच सर्व तूच। ऐकले मी ॥ २ ॥
वर्णिले आत्मरूप। आत्मरूप, विश्वरूप।
दाखवी ते दिव्यरूप। जरी शक्य ॥ ३ ॥
तुझा हट्ट पुरवितो। दिव्यदृष्टी तुला देतो।
भक्त किती आवडतो। कळो जनां ॥ ४ ॥
शंखचक्रगदाधारी। रूप पाहा डोळेभरी।
आता सौम्यरूपधारी। ध्यानी ठेव ॥ ५ ॥
नाही सीमा विस्ताराला। उग्ररूप घेतलेला।
निघे जगा गिळायाला। माझे रूप ॥ ६ ॥
ज्वालामुखी जणु आहे। मृत्युमुख ते मी आहे।
सर्व सर्व भक्षिताहे। भूक माझी ॥ ७ ॥
युद्ध कर, करू नको। गर्व वृथा धरू नको।
मीच कर्ता गर्जू नको। काळ तो मी ॥ ८ ॥
आधीच या मारलेले। तुझे साधन मी केले।
विश्व सर्व माझ्यामुळे। तू न कोणी ॥ ९ ॥
जाण ईश्वरी वैभव। क्षुद्र माणसाचा गर्व।
तुज लढवी स्वभाव। क्षत्रियाचा ॥ १० ॥
जसा सौम्य तसा रौद्र। जसा शांत तसा उग्र।
हातपायही सहस्र। दिसते ना ॥ ११ ॥
नको गर्व शूरत्वाचा। नको गर्व कर्तृत्वाचा।
अहंभाव अज्ञानाचा। सोडी पार्था ॥ १२ ॥
भक्तिभाव आवडला। विश्वरूपाचा सोहळा।
कोणी अन्ये न पाहिला। भाग्यवंता ॥ १३ ॥
कर्तव्याते नित्य कर। फळ अर्पून सत्वर।
माझा ध्यास सदा धर। अर्जुना तू ॥ १४ ॥
सोड, सोड व्यक्तिस्वार्थ। पाहा समाजाचे हित।
ठेव स्वरूपा ध्यानात। मननाने ॥ १५ ॥
दोन्ही सगुण निर्गुण। रूपे ध्यानात घेऊन।
विश्वी मला निरखून। शुद्ध व्हावे ॥ १६ ॥
ईश्वरच महाकाल। सौम्य तसा विकराल।
मना बनवी विशाल। कृपा त्याची ॥ १७ ॥
गीता निगर्वी करते। गीता भक्ती शिकविते।
गीता मोह घालवते। हळूहळू ॥ १८ ॥
अध्याय हा अकरावा। थोर विस्मयाचा ठेवा।
संपवीत देहभावा। भाविकाच्या ॥ १९ ॥
नाट्यमय हा अध्याय। वाटे ऐकता विस्मय।
भक्ता विश्व हरिमय। योगबळे ॥ २० ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment